कोरोना लॉकडाऊन: 'कधी कधी वाटतं इच्छा मरणाला परवानगी असती तर कधीच स्वीकारलं असतं'
शनिवार, 16 मे 2020 (17:50 IST)
दीपाली जगताप
बंद खोलीत दररोज सतत कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी आपल्याला लॉकडाऊनने दिली. कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराचा सामना करण्यासाठी कुटुंब म्हणून सगळे एकत्र राहत आहोत. पण विचार करा त्या आजी-आजोबांचा, जे अशा अभूतपूर्व संकटाच्या काळातही कुटुंबापासून दूर वृद्धाश्रमात राहतायत.
इंग्लंड, स्कॉटलँड या देशांमध्ये वृद्धाश्रमात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. 25 एप्रिलपर्यंत 16% कोरोना रुग्णांचा मृत्यू हा वृद्धाश्रमात झाल्याचं सरकारी अहवाल सांगतो.
"माझ्या मनात कधी कधी येतं आमच्यासारख्या वृद्धांचा काहीच उपयोग नाही. प्रॉडक्टिव्ह असं आम्ही काहीच करत नाही. आम्ही आता घेणारे आहोत, देणारे नाही. त्यामुळे कधी कधी वाटतं इच्छा मरणाला परवानगी असती तर कधीच स्वीकारली असती. पृथ्वीवरचा भार कमी झाला असता," या भावना आहेत वृद्धाश्रमात राहणाऱ्या 90 वर्षांच्या सूर्यकांत कुलकर्णी यांच्या.
नवी मुंबईतील नेरुळ इथल्या आनंदाश्रम वृद्धाश्रमात सूर्यकांत कुलकर्णी आपल्या पत्नीसोबत राहतात. त्यांच्याप्रमाणेच आणखी 30 ज्येष्ठ नागरिक इथे राहतात. कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून खबरदारी म्हणून आनंदाश्रम वृद्धाश्रमात कुणालाही खोलीबाहेर येण्याची परवानगी आता नाहीय.
यावर कुलकर्णी आजोबा सांगतात, "हे सगळं आमच्यासाठी फारच कंटाळवाणं आहे. आधी शुद्ध हवेत जाता येत होतं. पण आता बाहेरही पडता येत नाही. पण याचा सामना करावा लागतोय."
वृद्धाश्रमात सध्या सगळ्यांना एकत्र जमता येत नाहीय. टीव्ही पाहता येत नाहीय. मग सगळे काय करतायत? तर कुणी फोनवर गप्पा मारत दिवस घालवतं. तर कुणी देवाचं नामस्मरण करतं. कुणी वाचन करत आहे तर कुणी मौनात आहे.
याविषयी सूर्यकांत कुलकर्णी सांगतात, "मी मोबाईलवर वेळ घालवतो. माझी पत्नी काहीतरी कलाकुसर करत असते. ती सध्या फाटक्या कपड्यांपासून पर्स बनवण्याचं काम करत आहे. त्यातच तिचा दिवस जातो."
'नातेवाईकांनी फिरवली पाठ'
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव लक्षात घेता विविध वृद्धाश्रमांमध्ये बैठका घेण्यात आल्या. अशा परिस्थितीमध्ये वृद्धाश्रम कशी चालवायची ? यावर चर्चा करण्यात आली.
आनंदाश्रम वृद्धाश्रमात सगळ्या वृद्धांना मास्क देण्यात आले आहेत. पुरेसे सॅनिटायझर वापरण्यात येत आहे.
सगळ्यांना खोलीतच जेवण आणि इतर वस्तू दिल्या जातील असाही निर्णय घेण्यात आला आहे.
"वृद्धाश्रमातील वृद्ध स्वेच्छेने आपआपल्या घरी गेले तर त्यांच्या प्रकृतीसाठी उत्तम होईल असं आम्हाला वाटलं आणि आम्ही सगळ्यांच्या मुलांना, नातेवाईंकांना फोन केले. पण तुम्हाला काय सांगणार?" नातेवाईकांकडून नकारात्मक प्रतिसाद आल्यावर वृद्धाश्रमाच्या कार्यकर्त्या कल्पना साठे यांनी बोलून दाखवली.
त्या म्हणाल्या, "काही मुलं परदेशात असल्याने ते आई वडिलांना घेऊन जाऊ शकत नव्हते. काहींनी सांगितलं आमचं घर एवढं लहान आहे की उलट या काळात ते वृद्धाश्रमात अधिक सुरक्षित राहू शकतील. पण काही मुलांना आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना घेऊन जाणं सहज शक्य आहे. पण त्यांनी कळवतो म्हणून सांगितलं आणि नंतर साधा फोनही केला नाही."
वृद्धाश्रमातल्या एका खोलीत दोन बेड आहेत. खबरदारी म्हणून सध्या बहुतांश वृद्धाश्रमांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सर्वकाही खोलीतच आणून दिलं जात आहे. पण वृद्धाश्रमात काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाला वाहतूक व्यवस्था बंद असल्याने आश्रमात पोहचता येत नाहीय.
याबाबत कल्पना साठे सांगतात, "आता आजी आजोबांनाही वृद्धाश्रमाची सवय झाली आहे. कर्मचारी आले नाहीत तरी भाजी निवडणं, त्याची थोडी तयारी करणं अशी मदत ते स्वत:च करतात. पण स्वयंपाक करण्यासाठी कुणीही येऊ शकलं नाही तर मोठी अडचण होते. याबाबत स्थानिक सरकारी व्यवस्थेकडून आम्हाला मदत अपेक्षित आहे."
कुटुंबाची आठवण
कुटुंबाची साथ असेल तर कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी धीर मिळतो असं म्हणतात. पण उतारवयात संकट प्रसंगी कुटुंब सोबत नसल्याची भावना काय असते हे वृद्धाश्रमातील आजी आजोबा नेमकं सांगतात.
"मला घरातल्यांची खूप आठवण येते पण काय करणार?" अशी प्रतिक्रिया पद्मा आजी देतात. त्या नेरुळच्या आनंदाश्रम वृद्धाश्रमात राहतात.
पद्मा वैद्य बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या, "मी आपलं देवाचं नामस्मरण करते. आठवण सगळ्यांची येते. पण काही इलाज नाही. खोलीत बसून वाचन करते."
वृद्धाश्रमात राहणाऱ्या जवळपास सगळ्यांनाच आपल्या कुटुंबाची आठवण येते. आता समाज माध्यमांच्या वापराची सवय त्यांनाही झालीय. सूर्यकांत कुलकर्णी सांगतात, "बरं झालं व्हॉट्सअप, फेसबुक आहे. त्यामुळे कुटुंबाच्या संपर्कात राहता येते. आम्ही सहा भाऊ आणि चार बहिणी. सगळ्यांना आता नातवंडं झाली. सगळे व्हॉट्सअपवर वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवतात."
लॉकडाऊनमुळे वृद्धाश्रमांसमोर आर्थिक संकट
ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा जवळील खडवली येथे 3 एकर जागेवर मातोश्री वृद्धाश्रम आहे. 100 वृद्ध राहतील एवढी या वृद्धाश्रमाची क्षमता आहे. 22 वर्षांपूर्वी बांधलेल्या वृद्धाश्रमात सध्या 93 जण राहत आहेत. वृद्धाश्रमात 10 बेड्सचे छोटे आरोग्य केंद्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
मातोश्री वृद्धाश्रमातले कर्मचारी तिथेच राहत असल्याने दैनंदिन कामात त्यांना अडचणी येत नसल्याचं ते सांगतात. पण वृद्धाश्रम आर्थिक दान आले तरच सुरू राहू शकतो. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात वृद्धाश्रमांसमोरही आर्थिक संकट आहे.
या वृद्धाश्रमाचे सह संचालक अशोक देवरे-पाटील सांगतात, "वृद्धाश्रम डोनेशनवर चालतं. वर्षाला साधारण आम्हाला साडे सात लाख रुपये इतका खर्च येतो. काही संस्थांकडून आम्हाला आर्थिक मदत दर महिन्याला केली जाते. पण घरोघरी जाऊनही आम्ही मदत मागत असतो. लॉकडाऊनमध्ये सर्व बंद असताना डोनेशन कसं होणार याची चिंता आम्हाला आहे."
'लॉकडाऊन'च्या जुन्या आठवणी
कोरोनासारखे गंभीर आरोग्य संकट यापूर्वीही अनेक देशांनी अनुभवले आहे. भारतातही विविध परिस्थितींमध्ये नागरिक घरात अडकल्याचे अनुभव आहेत.
90 वर्षांचे सूर्यकांत कुलकर्णी 50 वर्षे कोलकात्यात नोकरीनिमित्त राहत होते. भारत-पाकिस्तान युद्धावेळी लॉकडाऊनमध्ये अशा बंद खोलीत राहण्याचा एक अनुभव त्यांनी सांगितला.
"काही स्पष्ट आठवत नाही. पण भारत पाकिस्तान युद्ध सुरू होतं. तेव्हा मी जिथे राहत होतो त्या परिसरात वायूसेनेकडून गस्त घालण्यात येत होती. आम्ही खोलीतला दिवा जरी लावला तरी हा दिवा बंद करा असं आम्हाला सांगितलं जायचं."
पश्चिम बंगालमध्ये एक दिवसाचा बंद वारंवार पुकारला जायचा. पण तो राजकीय बंद असायचा. एखाद्या संसर्गाशी सामना करण्यासाठी असं बंद खोलीत राहण्याचा हा पहिलाच अनुभव असल्याचं ते सांगतात.
यूकेतल्या वृद्धाश्रमांत कोरोनाचा फैलाव
इंग्लंड,वेल्स या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृद्धश्रमातील वृद्धांचा मृत्यू कोरोनामुळे होत असल्याचं समोर आलं आहे. इंग्लंडमध्ये 15 हजाराहून अधिक केअर होम्स आहेत.
राष्ट्रीय संख्या कार्यालय आणि केअर क्वालिटी कमिशनने दिलेल्या माहितीनुसार,
10 ते 25 एप्रिलदरम्यान 4 हजार 343 जणांचा केअर होममध्ये मृत्यू झालाय.
स्कॉटलंडमध्ये 2 हजार 272 मृत्यूंपैकी 40 टक्के मृत्यू केअर होम्समधील आहेत.
30 एप्रिलपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंपैकी 16 टक्के लोक हे वृद्धाश्रमातील आहेत.
महाराष्ट्रात किती वृद्धांमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव?
यूकेच्या तुलनेत भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी आहे. यूकेतल्या केअर होम्स कोरोनाचा फैलाव वाढला आणि मोठ्या संख्येने केअर होम्समध्ये मृत्यू झाले.
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, 10 मे पर्यंत राज्यात 18 हजार 976 रुग्णांपैकी 51-60 वयोगटात 2 हजार 883 रुग्ण आहेत. तर 61-70 वयोगटात 1609 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 71-110 वयोगटात एकूण 808 रुग्ण आहेत.